Selections from the Peshwa Daftar 2.54: [2-12-1755] Antaji Mankeshwar writes in his usual boastful manner what exertions he had made to lead forces to the succour of Dattaji Scindia.
Selections from the Peshwa Daftar 2.54
- Language
- Marathi
[2-12-1755] Antaji Mankeshwar writes in his usual boastful manner what exertions he had made to lead forces to the succour of Dattaji Scindia.
2.54.1
श्री.
2.54.2
श्रीमंत राजश्री भाऊसाहेब स्वामींचे शेवेशीः
2.54.3
विनंती सेवक अंताजी माणकेश्वर, कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. सेवकाचें वर्तमान तागायत कार्तिक वद्य १४ चतुर्दशी मुक्काम दिडवाण नजीक नागोर, प्रांत मारवाड, स्वामींचे कृपेंकरून यथास्थित असें विशेष. आम्हांकडील वर्तमान तरी कार्तिक शुद्ध १ प्रतिपदेस आम्ही यांजपाशीं दहा हजार फोजेनिशीं पोंहचलों. राजे माधोसिंग जयेनगरकर यांस बिजेसिंग राठोड यांणें कांहीं पैका दिल्हा आणि राजश्री जयाजी आपाचा काळ जाल्या दिवसापासून माधोसिंगानें तमाम फौज जमा करविली. सेखावत राजावतन रुके बिजैसिंगाचां पुत्र व त्यांचे तर्फेचे राजे बिकानेरवाले व रुपनगरवाले ऐसें महिनाभर फौज पंचवीस तीस हजार जमा करून मारवाडचे सरदेस आले जे. राजश्री दत्ताजी पाटील शिंदे यांस नागोराहून उधळून मारवाडांतून काढावें. तिकडून विजेसिंगानें बाहेर निघावें. तेव्हां राजश्री दत्ताजी शिंदे यांणीं खानाजी जाधव व राणोजी भोईटे चार हजार फौजेनिशीं यांवरी रवाना केले; रामसिंग याची फौज दोन हजार ऐसें सहा हजार यांचे भोंवते भोंवतें फिरत होते. ते भारी तीस हजार, तोफखाना भारी, यांस रेटून जबरदस्तीनें नागोरास चालले. पंचवीस कोस नागोर उरलें तों आम्ही जयेनगर प्रांतें दहा हजार फौजेनिशीं येऊन पोंहचलॉ. तमाम माधोसिंगाचा मुलूक मारून जाळून थोर थोर मजली करून चालिलों. राजश्री जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे यांचीं पत्रें एका दिवसांत चार ऐसीं रोजचे रोजांत दररोज येऊं लागलीं कीं, नागोराकडे न येणें. बुणगें टाकून जयेनगरचे फौजेवरी येऊन, ते फौज तंबी करणें, म्हणजे सारें मारवाडचे मोहिमेचें येश तुम्हांस येतें. कैलासवासीं राजश्री आपांच्या स्नेहाचें सार्थक होईल. ऐसें नाना प्रकारचे कागद लिहिले.
2.54.4
तेव्हां सोळा सोळा कोसांचीं कूचें करून प्रहर रात्रीस सडी फौज मुकामास दुमदारी सांभाळून येऊन, ऐसें करून दिंडवणीयावरी येऊन पोंहचलों. दुसरें दिवशीं फौज तयार करून, तमाम कहीं मारून, चारशें माणूस मारून, मोंगल सारा शहराच्या असन्यास नेऊन घातला. भोंवतें रात्रींदिवसा उभेच राहून सिर्कींदा केला आहे. दोन शेर गवत रुपयाचें व दोन शेर दाणे रुपयाचे आहेत. कौल मागून आपले आपले घरास जावयास निरोप मागतात. परंतु देतां येत नाहीं. सेवकाची फौज जयेनगरचा मुलूक मारीत आली. चांगलीच फौज पोंहचली या (मुळें) तमाम यांचीं अवसानें गेलीं. आम्ही आलियाउपरी आठवे रोजीं नागोरांतून राजे विजेसिंग तीनशें प्यादे, शंभर स्वार रात्रीं पळाला आणि या कछव्याच्या फौजेंत येत होता. मार्गीं आमची फौज भारी या फौजे भोंवती होती. तो मागती फिरला तो बिकानेरास गेला. तेथें आतां जमाव करितो. जमाव करून मैदानांत या फौजेंत आला तरी चिंता नाहीं. सारे एक जागा करून सडकून मारून. आमच्या लष्करात पांच शेर दाणे धारण आहेत. पाणी विहीरीचें खारें शंभर दीडशें हात दोर लागतो. असो. राजश्री जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे नागोरीं आहेत. आम्हांस त्यांस अठरा कोस तफावत आहे. कासीद एका दिवसांत जातो. लष्करची वाट दों दिवसांची आहे. सारांश हे फौज आम्ही सडकून बुडवितों. स्वामीचा प्रताप समर्थ आहे. परंतु शिंद्यांची फौज मारवाडांत फार बुडाली. काळ मोठा. प्रस्तुत आम्हांवरीहि बेतली* आहे. प्रथम आम्ही कालपी-पर्यंत कडाकोराच्या अंमलाबद्दल गेलों. तेथें राजश्री जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे यांचीं पत्रें दररोज जोडी १ एक येऊन पोंहचों लागलीं कीं, राजश्री आपास दगा जाला. आमचा उपराळा कोठूनहि होत नाहीं. शत्रूंनीं बळ बांधून कच्छवे व तमाम राजे येकवट होऊन, तीर्थरुपांप्रमाणें आमची अब्रू घ्यावयास पाहतात.
2.54.5
आम्ही तरी जिवाचा संकल्प करून बसलों आहों. तीर्थरुपांचा तुमचा रिणानबंध होता. आमचे म्हणवीत होता. तो समये आजी खरा करून दाखवणें. धातूपोषण करून उगेच समाधान न करणें. आजीचें येहसान आम्हांवरी मोठेसें राहील. येविसीं श्रीमंत स्वामीहि बहुत संतोषी होतील. मागाहून श्रीमंतांचीं आज्ञापत्रें येतील. परंतु हा समयें सांभाळणें. आमची अब्रू आजी येऊन राखिली तरी, जोंवरी आमचें बरें तोंवरी तुमचें बरें. पूर्वस्नेहाचें सार्थक तेव्हांिच. व जेथवरी स्वार मिळेल तेथवरी भारी फौज करून येणें. शिबंदी भारी जाली याची चिंता सहसा न करणें. आमच्या वचनावरी श्रीमंत स्वामी सर्व निर्वाह करून देतील. ऐसीं पंचवीस पत्रें नाना प्रकारें ममतेनें आलीं. तो विस्तार कोठवरी लिहावा ? पत्रेंच त्यांची वजिन्नस आहेत. तेव्हां कालपीहून गोपाळरायांचा निरोप घेतला. तेव्हां राजश्री गोपाळराऊजी आपल्या मामल्यासाठीं फार श्रमी जाले. तें आम्ही मान्य केलें आणि फौज जमा करून ठेवीत ठेवीत ग्वालियेरप्रांतींपर्यंत आलों. झांसीस व जागां जागां माणसें पाठविलीं. कोणी पांच स्वार न येत. तेव्हां जे जेथें ज्याचे लोक होते तेच फोडून चाकर ठेवून आपली फौज कदीम पांच हजार चांगली होतीच, नवी तीन हजार मऱ्हाठी ठेविली. कांहीं अगोदर सुरजमलाचे कुमकेसाठीं ठेविली होती ते होतीच. कांहीं आणिक ठेवून आठ हजार फौज मऱ्हाठी व हिंदुस्थानी दोन हजार, त्यांत गोहदकर जाट, गोपाळसिंग जाधव व करोलीवाले एक हजार स्वार व एक हजार फुटकळ पठाण वगैरे येसीं दोन हजार, एकूण दाहा हजार फौज घेऊन, कुरोलीपासींच मळ नदी उतरावें, तों माधोसिंगानें, सुरजमलांनीं चंमळेचे घांट बांधलें. सुरजमलांनीं आपला पुत्र दाहा हजार फौज, आम्हावरी रवाना केला. माधोसिंगानें आपला बक्षी तयार केला.
2.54.6
मग आम्ही हे वाट टाकून डांगेंतील वाट काढून दाहा दिवस पाहाडांत चालिलों. सोपरावरूरून इंद्रगड, खातोलीजवळ चंमळ उतरून लाखेरीच्या दऱ्यानें जयेनगरच्या मुलकांत आलों. नेवाईवरी जाऊन मुक्काम केला. दुसरा मुक्काम फागीवरी, जयेनगरासंनिध साहा कोसावरी केला; आणि राजांस कागद पाठविला कीं, युद्धास येणें. मग त्यांनीं वकील पाठविला कीं, आतां त्यांचा आमचा सल्लख करणें. त्याजवरून राजे गोपाळसिंग कुरोलीवाले व आमचे त्रिंबक मुकुंद, जयेनगरास पाठविले कीं, आमची व राजश्री दत्ताजी शिंदे यांची भेटी होईल; त्यांचे जे जे मुद्दे असतील ते त्यांस पुसोन लिहून पाठऊन त्याप्रमाणें करून देणें, मग सल्लख होईल. आम्ही दत्ताजी शिंदे यांचे चाकर, निराळे सरदार नाहीं. हत्ती, शिरपाव पाठविला होता, तों फिराऊन पाठविला कीं, दिवाणकाम जालियाखेरीज घेणार नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
2.54.7
[१० हैराण.]
2.54.8
[१ कालहरण.]