Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.86: [24-2-1765 ?] This is a letter of one Dhondo Khanderao from Benares supplicating Raghoba's mercy. He informs that the English have driven Shuja out of Benares and are mercilessly plundering the city. Shuja has fled to Delhi to raise another force and try his luck once more.

Selections from the Peshwa Daftar 29.86

Language
Marathi

[24-2-1765 ?] This is a letter of one Dhondo Khanderao from Benares supplicating Raghoba's mercy. He informs that the English have driven Shuja out of Benares and are mercilessly plundering the city. Shuja has fled to Delhi to raise another force and try his luck once more.

29.86.1

पो छ २९ सफर (मोहरम?)
श्रावण शु॥ १

29.86.p2

श्री
तीर्थरूप राजश्री दादा साहेब वडिलांचे सेवेसी.
अपत्यें धोंडो खंडेराव चरणावर मस्तक ठेऊन शिरसाष्टांग नमस्कार विनंती. येथील सेवकाचें वर्तमान तागाईत फालगुन शुद्ध ५ पंचमी पावेतों स्वामीचे आशीर्वादेकरून श्रीकाशीमध्यें सुखरूप असें विशेष. स्वामीनी कृपाकरून आशीर्वाद पत्र पाठविलें तें श्री शिवरात्रीस येथें पावलें. गोविंद दादाजी याचे जबानी निरोप पाठविला तो सर्व तपशीलवार त्यांनीं सांगितला, त्यावरून मला बहुत पश्चाताप जाला तो पत्रीं लिहितां पुर्वत नाहीं. स्वामीची येथें भेटी होईल ते समयीं विदित करीन. मी सर्वप्रकारें अपराधी आहे. स्वामीस वाईट लिहिलें त्याचें फल मला येथें श्री विश्वेश्वरानें फिरंगी व गारदी यांजकडून उत्तम प्रकारें देविलें! ते जीवेंच मारीत होते; परंतु आपलें नांव पदरीं होतें म्हणोन वांचविले! ते समयीं सर्वानी दंड रुपये दीडहजार रुपये देखीलव्याज पावेतों पडला तो देविला. आणखीहि दंड रुपये मागतात. मी लपत फिरतों; ती आपत्ति पत्रीं कोठवर ल्याहावी.? वेदशास्त्रसंपन्न राजश्री श्रुतिधरभट पुराणिक येतील ते सांगतील. सर्व मातबर ब्राम्हणांवर कष्ट बहुत जालें तें पत्रीं कोठवर ल्याहावें? मागती सुज्यातदौल्ला दिल्लीस गेला आहे तो राजश्री मल्हारजी होळकर व.
4202 जाट व रोहिले यांसी घेऊन येतो. सत्वरच येईल ऐसें आहे. यास्तव मागती मोठी गडबड येथें आहे. ये समयीं घरें व जवाहीर कोण विकत घेतो?. जवाहीर सोनें रुपें याचें नांव घेतलें म्हणजे फिरंगी लुटतील. राजा बळवंतसिंग येथील मातवरास दाऊन देतो, याचें भयास्तव कोण्ही बाहेर निघत नाहीं. आपण धर्म अवतार आहां, कर्णाप्रमाणें श्रीकुरुक्षेत्रीं रुपये वाटिलें, बलिराजाप्रमाणें आपण उदार, अर्जुनाप्रमाणें पराक्रमी आहेत; सर्व सेवकांस व सर्वास विदित आहे. मजकडून जे अपराध जाले असतील ते सर्व माफ करावे; अतःपर कधीं वाईट लिहिणार नाहीं. आपले चरणांची शपथ असे. मजवर कृपा आपल्यासारखी कोण करील.? मजला आपल्यासारखा कोण्ही रक्षिता नाहीं. आपण उपेक्षा केलियाणें माझा प्राण राहणार नाहीं. वेदशास्त्रसंपन्न राजश्री रामचंद्रभटास हिशेब दाखविले; त्याचे मतें सर्व लबाड कारभार आहे. ते कांहीं माझी अब्रू ठेवीत नाहींत, तो विस्तार कोठवर लिहावा.? येथें स्वामीच्या आज्ञेवरून सरकारचे वाड्यांत आहे; सर्व लोक हेंच जाणतात कीं स्वामीचा पुत्र आहे, त्यास रुपयास काय कमी? माझें घरीं तरी मजला अन्न वस्त्र मिळत नाहीं, तृण-काष्ठहि नाहीं, पुत्र मुंजीचा जाला आहे. सर्व आपत्ति बहुत आहेत. कर्जदार बहुत उपास पाडतात. रामचंद्रभट आपले आज्ञेखा येक कवडी देत नाहींत. म्यां कर्जदारांस येक गाहाणाचें घर व्याजामध्यें दिल्हें, व येक गाहाणाचें घर मुदलामध्ये दिल्हें. बाकी वीस हजार कर्ज राहिलें, व पोटखर्च दांड वगैरे शिबंदी मिळोन पंचवीस तीस हजार रुपये कर्ज राहिलें. आपण कृपा करतील तरी कांहींच नाहीं. आपण उदार दानशूर आहेत. पूर्वी राजश्री गणेश संभाजी याजवर तिसा हजारांची वरात पाठविली होती तेच रुपये राजश्री बालाजी गोविंदाकडून देववावे. अथवा राजश्री मल्हारजी होळकर याजडून हरयेक ऐवजीं देववावें, म्हणजे सर्व कर्ज फेडून मी निश्चित्त होईन; हें आपल्यांवांचून माझा उद्धार कोण करील.? आपण क्षमाशील दाता आहेत, आपली तारीफ म्यां पत्रीं कोठवर ल्याहावी.? येक दोन घरे घेतलीं तीं बहुत उत्तम आहेत, निर्दोष अंतरगृहीं बाहेर आहेत; श्री गंगातीरीं आहेत. याप्रमाणें घरें श्रींत आणखी नाहींत. येक स्वामीकारणें व येक छत्र घालावयासी ब्राम्हणभोजनास पाहिजे, यास्तव घेतलें असें. याचा मनोरथ आपल्यांवांचून कोण माझा पुरवील? अद्यापि पुरती खरेदीं जालीं नाहींत. च्यार दिवसा जाले नाहींत तों मागती विकावीं हा अर्थ उत्तम नाहीं. आपण राजश्री रामचंद्राप्रमाणें, मी आपला किंकर आहे. ज्यांचा वंश नसतो तेहि श्रीकाशींतील घरें विकीत नाहीं.
यास्तव सेवकानें तपशीलवार लिहिलें असें. एकदां मजला कर्जदारांपासून मुक्त करावें. आपण कृपा करितील तरी सर्व होईल. अतःपर आज्ञेशिवाय कर्ज करणार नाहीं व आज्ञेशिवाय घरेंही घेणार नाहीं. हीं घरें कोणांस देऊं नयेत. घरें थोर थोर आहेत. ब्राम्हणांस दान घरें देणें तरी सेवकास लिहून पाठवावें, चौ पांन्चा हजारांत घरें बहुत मिलतात. नवी घरें घेऊन ब्राम्हणांस आज्ञेप्रमाणें देईन. हीं घरें दोन सरकारांत ठेवावीं, बहुत उत्तम आहेत. पत्रीं कोठवर ल्याहावें.? राजकी वर्तमान पारशी पत्रीं लिहिलें आहे त्यावरून सर्व विदित होईल; त्याप्रमाणें सेवकाविशी शिफारसपत्रें पाठवावीं. राजश्री मल्हारजी होलकर व माहादजी शिंदे व राजश्री बाळाजी गोविंद यांसी माझेविशी पत्रें शिफारशीचीं पाठवावीं कीं धोंडो खंडेराव राजकारणी मजकूर लिहून पाठवील त्याप्रमाणें सरकार किफायती असल्यास करणें. ऐशीं पत्रें सेवकाकडे सत्वर पाठवावीं. येथें राजकारणें सेवकापाशीं स्वामीचें नांवास्तव बहुत येतात यास्तव जरूर पारशी येवनास व सर्वास पत्रें पाठविणार स्वामी समर्थ आहेत. मागील वेदशास्त्रसंपन्न राजश्री बालकृष्ण दीक्षित याजकडील ऐवज आला होता त्याचा खर्च पूर्वी कोन्हेरा भटाबराबर पाठविला होता, हल्लीहि पाठविला असें. मागाहूनहि राजश्री गोविंद दादाजी व भोजराज शंकर कारकून यांजबराबर मागती पाठवीन. तूर्त आज्ञेप्रमाणें येक कावड पाठविली आहे. आरधें श्रीत्रिवेणी जल व अर्धें श्रीमणीकर्णिकाजल असें. त्यासी वीस रुपये द्यावे. आणखी रुद्राक्ष व हिरडें व गंगावन वगैरे शंखोदर गोल्या पाठवाव्या तरी मजपाशीं रुपये नाहींत. रामचंद्रभटास पुसावें तरी ते म्हणतात की तुम्हास या कारभारांवाचून काय पडलें आहे ? जे समयीं त्यांचे विचारास येईल तेव्हां पाठवितील. सेवकास स्वामीचा आशीर्वाद व कृपा मात्र पाहिजे, व आज्ञेप्रमाणें सेवा करावी हा मात्र मनोरथ आहे. रामचंद्रभट बहुत उदास होतात, पत्रीं लिहिता पुर्वत नाहीं. तेहि मी गुरुच मानितों. म्या पूर्वी जवाहर व सोनेरुपें स्वामीचे जयास्तव संकल्प घातला कीं सर्व धर्म करावा तो मनोरथ पूर्ण करणारे स्वामी कर्णावतार आहेत. स्वामीवाचून या जगतांत कोण उदार आहे.? माझे पूर्वील सर्व अपराध क्षमा करावें, रुपये पाठऊन कर्जापासून मुक्त करावें. स्वामी वाचून माझी अबरू कोण ठेवील ? बहुत काय लिहिणें हें विनंती.