Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.14.13

Selections from the Peshwa Daftar 2.14.13

Language
Marathi

2.14.13

विनंति सेवक गोविंद बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. तागायत भाद्रपद वद्य त्रयोदसी पावेतों स्वामीचे कृपावलोकनें करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. कायेमखान बंगस यांसी व सर मुरादाबादवाला महमद-अल्लीखां पठाण याचे पुत्रासी पेशजीं जूझ होऊन कायेमखान फौज लुटली गेली. त्याजवर नवाब मनसुरआलीखां येऊन फरकावादेस ठाणें बसविलें. जागा तमाम घेतल्यावर कायेमखानाची आई होती, व अहमदखान भाऊ होता, त्याणी नवाब मनसूरअलिंखां याजकडे जाऊन रदबदल केली. तेव्हां त्याणी फरकाबाद वगैरे बारा गांव देऊन त्यांची स्थापना फरकावादेस केली. नवाब दिलीस गेले. नवलराये बक्सी फौजेनसी अंतरवेदींत राहिले. त्यांजपासून कांहीं फौज निरोप घेऊन गेली. सात आठ हजार फौज नवलराय यांजवल राहिली. फौज थोडकी पाहून कायेमखान याचे आईनें व भावानें तमाम पठाण फरुकाबाद व महमद अलिखान यांचे पुत्रासी स्नेह करून, तमाम पठाण एकत्र आठा रोजांत पंधरा वीस हजार जमाव करून, ठाणी तमाम मनसूरअलिखानाचीं उठविलीं; आणि नवलराये कनवजेवर (कनोज) होते, त्याजवर चढोन आले. श्रावण शुध द्वादसीस खुदागंज येथें अहमदखानाचें व नवलरायाचें जूझ जालें. नवलराये मारले गेले. पांच हजार पठाण, रजपूत व प्यादे कामास आले. पठाणाची फत्ते जाली. हें वर्तमान नवाब मनसूरआलीखान यांस कळलियावर खासा दिल्लीहून कूच करून दोन मजली आले. हें वर्तमान अहमदखान पठाण यासी कळलें. यावर हेहि त्याचे रोखें दोन मजली कूच करून गेले. हेहि जमाव करित आहेत. वजिरहि जमाव करितात. त्यास महमदअलिखान रोहिले त्यासी व फरकाबादवाले पठाण यास स्नेह जाला. पांच हजार फौज, दाहा हजार प्यादे यांचे मदतीस त्याणी पाठविले आहेत. वजिराबराबर तीस हजार फौज आहे. दिलींत फितुर जाला आहे. त्यास जें वर्तमान होईल तें वरचेवर सेवेसीं लिहीत जाऊन. या प्रांतीं गडबड बहुत जाली. पातशाहीत कजिया जाला आहे. अयोध्या प्रांतीं व लखनऊन व अंतरवेदींत तमाम जमीदारानी कजिया केला आहे. त्या समईं स्वामीची फौज वीस हजार असती तर स्वामीचें कार्य होतें आणि तमाम नक्ष होतो. पातशाहीत कजिया, याजमुळे तमाम जमीदार लबाडीत आले आहेत. श्रीमंत महाराज छत्रपती स्वामी कैलासवासी जाले. या प्रांतीं फौज व मामलेदार कोणी जेष्ठ पावेतों न आले आणि या प्रांते फौज होती ते देशास गेली. श्रीमंत राजश्री नाना-स्वामीसी व श्रीमंत राजश्री महाराजासी कजिया जाला. आपसांतच कजिये लागले. या प्रांतें कोणी येत नाहीं हे सर्वानीं मनसुबे रजवडे भूमीये जमीदार याणी करून येमुना तीर प्रांतें कजिया केला. गांव जागा बहुत मारली, लुटली, जालिली. आषाड श्रावण पावेतों कजिया यामुळे जमीन ... ते न ... ली. तमाम जमीनदारानी खराबी केली. राजश्री नारो शंकर याचेहि जागेयांत कजिया बहुत जाला.