Selections from the Peshwa Daftar 2.18.13
Selections from the Peshwa Daftar 2.18.13
- Language
- Marathi
2.18.13
जर विजयेदशमी करून राजश्री सुभेदार इंदुराहून या प्रांते येतात किंवा परभारे देशास जातील. जर देशास जातील तर आम्ही लाचार आहो. माधोसिंगाचेच मरजीनुरुप एकास दाहा पंधरासे रावतानिशीं भले मनुष्य शामील फौज माधोसिंगाचे करून देऊन मग ते जे कर्तव्य करो. खासा जावे हे तर विदीत नाहीं. याप्रकारे महारावजीस बोध करून लाऊन घेतले. सुभेदाराची मार्गप्रतिक्षा केली. त्यास श्रीसुभेदारजी तर उतावलीनेच येतो परंतु गौतुमाबाईचा प्रकार वीस दिवस अवरोधाचा जाहला. तथापि दसरियाचे महुर्ते कूच केला. ते वीस हजार व मातबर तोफखान्यासहित येऊन मकुंददन्यांतून पाचा कोसावर येऊन पावले; व नेणवेकरास खातरजमाची पत्रे पाठविली जे आलो, जागा सांभाळून राहणे. दुसरे कोटेकरास लिहिले जे जर लवकर येऊन आपले सरहदेवर भेटताच कराराप्रमाणे ऐवज पावतां तर तुमचे मुलकांत उजाड न होऊन देता. तिसरे मुक्कामाने चंबलपार होऊन जाऊ. नाहीं तर मुलुक उजाडला म्हणून नालीस न करणे. या प्रकारे साफ पत्रे पावली. तत्क्षणीच महारावजीनी राजश्री आखेराम दिवाण यासमागमे हजार राऊत देऊन राजश्री सुभेदाराकडे छ १७ मजकुरी भेटीस पाठविले. दिवाण मजकूर थोडे बहुत साजसरंजाम फारफरमायेशीसहित गेला. बहुतकरून दऱ्याबाहेर जाऊन भेटला असेल. भेटीनंतर उत्तम मार्ग चंबळा तीरास पुढे घेऊन येईल. त्याचा निश्चय आहे. उमेदसिंग बुंदीकर तर सर्वप्रकारे सरकारचा आहे. राजे माधोसिंग तर उणियारोखेस लागले. पाटण वगैरे जेन्ह केले. मातबर राजे साहेब फौज व दुसरे दीपसिंग, उमेदसिंग रावराज्याचा भाऊ माधोसिंगाचे जवळ किसनसींग, रावराजे दिलेलसिंग याचे पुत्रहि, त्याचेच आश्रये आज पाच सात वर्षांपासून आहेत. ह्यास या गर्दीत सेमिधी व करेंवर माधोसिंगांनीं दिधली. त्यानींहि पाच चारसे स्वार प्यादे जमा करून परगणे मजकूरी अमल केला व नेणव्याचा परगणा सर्व खराब करून टाकिला; व दीपसिंगास कापरण व परगणे गनोलीचे पन्नास गाव तोडून बुदीचे कुवर पदवीची जागा दिधली. यामुळे रावराजा उमेदसिंग लाचार होऊन आपले पुत्रास चारसे रावतानिशी माधोसिंगाजवळ उणीयारेचे मुकामी पाठविता जाहला. लौकिक मात्र रक्षिला. परंतु अंतरंगी सुभेदार कधी येतील हेच इच्छा करित राहिला. त्यास भगवंते मागती सुभेदारजींस स्वामीप्रतापे या देशास आणिले. यामुळे बहुतांस सुख उत्तम प्रकारें जालें. राजे माधोसिंग यास वर्त [मान] आलें जे सुभेदार आले. त्यानी नंदलाल दिवाण यासी पांच सात हजार स्वारानिशी पाटणास पाठविला. कोटेककासहि ताकीद पत्रे लिहून दिधली जें, तुम्ही आपली मातबर फौज देऊन एकवाक्ये पुढे जावोन दरा बंद करावा. ताकिदीनें दिवाण पाटणास पाठविले. तोहि येऊन पावला. कोठ्याहून पाटण पावेतो पलीकडे चंबलेचे डेरे करून राहिले आहेत व खासा माधोजी जरीदो पंधरासे रावतानशी रणथंबोरावर पाहाास जातो. म्हणून उणयारीचे मुकामाहून गढास गेले. करोलीचा राजा व शिवापूरकर गौड हे व रावराजा उमेदसिंग याचा पुत्र समागमे होते. त्यास करोलीकर तर रुखसत होऊन करोलीस गेला. इंद्रसिंग गौड सिवपूरकर यास पाटणचे मार्गातून परभारे सिवपूरची वाट धरली. उमेदसिंग रावराजाचे पुत्रास निरोप न देता समागमे घेऊन गेले. उमेदसिंगानेहि निश्चय हाच केला कीं कदाचित माधोसिंग विचारतील कीं पुत्र ठेऊन घेतल्यानें उमेदसिंग स्वाधीन राहील व सुभेदारास न भेटले तर मजला चार आहेत त्यांतून एक मेला तर चिंता नाहीं. सुभेदार चंबलातीरास पावले म्हणजे आपले जमियतेंत जाऊं.