Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.26.3

Selections from the Peshwa Daftar 2.26.3

Language
Marathi

2.26.3

विनंति सेवक अंताजी माणकेश्वर, कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. सेवकाचें वर्तमान तागायत कार्तीक वद्य ५ पंचमी, मुक्काम खिचीवाडा, यथास्थित असें विशेष. राजश्री लक्ष्मण शंकर अद्यापि सुरंजेसच आहेत. आम्हाकडील फौज पांच सातशें जागां जागां त्यांनीं मागेंच रवाना केली आणि आम्हांस सांगितलें कीं, खिचीसी आम्हांस कजिया करावयाविसीं श्रीमंतांची आज्ञा आहे. तरी आम्ही सुरंजेच आहों. तुम्ही आपले फौजेनिशीं खिचीवाड्यात जाऊन त्यांसीं कजिया करण. जुंज भांडण करणें. म्हणजे तो वकील आम्हांकडे पाठवून देऊन आमचे मतलब करून देईल. त्यांचें आज्ञेप्रमाणें खिचीवाड्यांत येऊन खिचीचा आमचा कजियाहि बहुत जाला. शेवटीं खिचीचे वकील येऊन, राजश्री लक्ष्मणपंताची रजावंदी जाली. मग लक्ष्मणपंताचीं पत्रें आलीं. त्याजवरून आजी खिचीवाड्यांतून कूच करून कचनारचे सराइंस आलों. एकादों दिवसां लक्ष्मणपंत सुरंजेहून येणार. मग दरकूच राजश्री नारो शंकर यांजकडे जाऊन, मोठेंचे ठाणें आधी फत्ते करून, मग पुढें बुंधेलखंडांत जाऊन. राजश्री बापूजी वाजीराव अद्यापी कालपीसच आहेत. स्वामींचीं आज्ञापत्रें त्यांस आलीं कीं, तुम्हींहि सहा महिने तिकडेच राहणें. हे गोष्टी फार उत्तम आहे. हिंदुस्थानांत फौज असावी हें फार उत्तम आहे. स्वामींचीं आज्ञापत्रें वानवर पारभोंरी येथिल जागीरदार पातशाई चोपदार यांचे विषयीं आली. ज्याप्रमाणें सातारा करार केला आहे, त्याप्रमाणें सात हजार रुपये मात्र घेणें. जाजती उपसर्ग न लावणें; व गोपाळपंत कमाविसदार दूर करून, दुसरा कमाविसदार ठेवणें; व मौजे अंबरोलची गढी तुम्ही दलेलसिंग गुजर यांजला देऊन, त्यांजपासून रुपये ६००० सहा हजार नजराणा घेतला. यसें वर्तमान विठ्ठल सिवदेव यांनीं सांगितलें.