Selections from the Peshwa Daftar 2.26.5
Selections from the Peshwa Daftar 2.26.5
- Language
- Marathi
2.26.5
आज्ञेप्रमाणें सात हजार रुपयेच घेऊन, गोपाळपंत कमाविसदार पहिला दूर करून, दुसरा ब्राह्मण तेथें ठेवून, चोपदारांचा राजीनामा मागाहून सरकारच्या जासुदासमागम पाठवून देतों. अंबरोलची गढी मातबर बांधली आहे. खंदक भारी केला आहे. तो कांहीं सुप्रवर्ती गढी देत नाहीं. परंतु स्वामींचे आज्ञेप्रमाणें गढीस मोर्चे सुरूंग लावून गढी घेऊन चोपदारांचे हवालीं करून. परंतु हीं कामें करावयासी दोन महिने पाहिजे. येका दिवसानें होत नाहीं. परंतु अंतर सर्वथा पडों देणार नाहीं. आम्ही सेवेशी बोलावें एक, मागें करावें एक ऐसें सेवकाचें सामर्थ्य कायें आहे ? विठ्ठलपंतांचें सांगीवरून स्वामींनीं इतराजी केली. फार अथवा थोडा पैका तो स्वामींचा. स्वामींची आज्ञा उलंधावयासी प्रयोजन काये आहे ? राजश्री मल्हारजी होळकर यांस मनसूरअल्लीखान वजीर यांचीं पत्रें आलीं आहेत कीं, मातबर फौजेनिशीं सत्वर सामील होणें. जो मुद्दा असेल तो करून देतों. त्याजवरून त्यांचीं पत्रें आम्हांस आलीं आहेत. वरकडांसहि आलीं आहेत कीं, येऊन सामील होणें. याजकरतां मल्हारराऊ यांचीं पत्रें आलीं आहेत. सेवेशी विदित होय. राजश्री बापूजी बाजीराव यांस सहा महिने राहावयाची आज्ञा केली. फार उत्तम गोष्ट जाली. पूर्वी स्वामींची आज्ञाच होती कीं, जरी करितां बापूजी बाजीराव त्याप्रांतें राहिलेच, तरी आम्हांस लिहिणें. आम्ही बापूस लेहून पाठवून तुम्हीं व बापू मिळोन लक्ष्मणपंतांचीं कामें वरचेवरी करून, तुमचा सरंजाम सोडवणें. याैसियासी प्रस्तुत बापू इकडे राहिलेंच आहेत. स्वामींनीं एक पत्र राजश्री बापूंस पाठवून द्यावें कीं, तुम्ही व राजश्री अंताजीपंत मिळोन, अंताजीपंतांचा सरंजाम सुरळीत करणें.