Selections from the Peshwa Daftar 2.26.6
Selections from the Peshwa Daftar 2.26.6
- Language
- Marathi
2.26.6
याप्रमाणें राजश्री लक्ष्मणपंत यांस एक पत्र द्यावें जै, तुमचीं कामेंकाजें सत्वर उरकून घेऊन, बापूंस व अंताजीपंतास निरोप चार महिने अंताजीपंतांच्या सरंजामांत जावयासी देणें म्हणून, पत्र एक लक्ष्मणपंतास व एक बापूंस जरूर पाठवून द्यावें. हेंहि काम सरकारचें स्वामींचेंच आहे. कदाचित् स्वामी म्हणतील कीं, राजश्री मल्हारजी होळकरच त्याप्रांतें आले तरी त्यांस सामील होणें, म्हणजे ते सरंजामाचें काम करून देतील. तरी ते कांहीं काम राजश्री सुभेदार करून देत नाहींत व त्यांस फावत नाहीं. उलटे आम्हांस व बापूंस जमा करून नेतील. याैसियासी आम्हांस व बापूंस राजश्री सुभेदारांनीं मोठें कामासहि नेलें तरी तिकडील चाकरी करून येऊन. व राजश्री लक्ष्मणपंतांचाहि बोभाट कामाचा उरकून राहूं देणार नाहीं. परंतु उरल्याच दिवसांत तुम्ही बापू व आम्ही मिळोन आमच्या सरंजामांत जाऊन. याजकरितां सेवकाची विनंति उदास न करावी. येणेंप्रमाणें तीन कागद अगत्यरूप पाठवावे. एक बापूजी बाजीराव यांस जें:-अंताजीपंताच्या सरंजामांत जाऊन तुम्हीं व ते मिळोन अंमल बसवणें व राजश्री मल्हारजीबावांस एक पत्र जें:-तुमचें थोरले काम जालियाउपरी राजश्री अंताजी माणकेश्वर यांच्या सरंजामाचा अंमल बसऊन देणें, जैसीं दोन पत्रें जरूर पाठवून द्यावी. मग जैसा जैसा कामाचा रंग पडेल, तैसेंच आम्ही वर्तों. परंतु हीं दोन्हीं पत्रें पाठवावीं व लक्ष्मण शंकर यांस दोन पत्रें पाठवावीं जें:-तुमचें कामकाज आटोपून घेऊन, राजश्री बापू व अंताजीपंतांस ग्वाल्हेर प्रांतास जावयासी चार महिने निरोप देणें, म्हणून पत्रें जरूर द्यावीं. आमच्या रोजमरीयाची नेमणूक राजश्री लक्ष्मणपंतावरी अखेर कार्तिकमासपरियेंत आहे. पुढें नेमणूक नाहीं. तरी पुढील रोजमरीयाची सनद पाठवावयासी स्वामी समर्थ आहेत.