Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.29: [15-2-1751]

Selections from the Peshwa Daftar 2.29

Language
Marathi

2.29

श्री

श्रीमंत राजश्री...........पंतप्रधान.

स्वामीचे सेवेसी

विनंती सेवक गोविंद बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. तागाईत फाल्गुन शुद्ध प्रतिपदा पावेतों स्वामीचें कृपावलोकनेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असें विशेष. स्वामीचें आज्ञापत्र सादर जालें. सावकाराच्या तीन लक्ष वीस हजारांच्या वराता केल्या आहेत. तो येवज वराते प्रमाणें ज्यांचा त्यास पावता करणें म्हणून आज्ञा. त्यास सरकारी येवज देणें हें खरें. परंतु ईकडील विचार मोठा कठीण जाला आहे. येक तों चहुंकडे कजिया आणि स्वस्ताई बहुत; गल्यास कोणी घेत नाहीं; त्याजमुळें रयतेकडील पैसा येईना. कर्ज काढावें तर कजियामुळे सावकारांनीं तमाम दुकानें बंद केलीं. हुंडी तिलमात्र होत नाहीं, आणि कोणी कर्जहि देईना. मोठें कठीण यंदाचें वरीस आहे. निभाऊन घेणार स्वामी धणी आहेत. पठाणाकडील वर्तमान तर पठाणांनीं श्रीप्रयागास जाऊन शहर लुटलें, जाळिलें. बंदमवेशी करून श्रीगंगेस पूल बांधोन काशी क्षेत्रास उपद्रव द्यावयासी जाणार. या प्रांतीं चहूंकडे कजियाच आहे. तमाम जमीदार रजवाडे यांच्या नजरां फिरल्या आहेत. राजश्री मल्हारराव होळकर यांचें लस्करी आम्हाकडील बाबूराव विष्णु सरकारी येवजाच्या वसुलास (गेले आहेत). त्याणी जयनगरचें सविस्तर वर्तमान आम्हास (लिहिलें.) त्या पत्राची नकल करून स्वामीकडे पाठविली आहे. त्याजवरून सेवेसी निवेदन होईल. जयेनगरीं कजिया जाला. त्याजवरून तमाम रजवाडे भूमिये लबाडीस आले म्हणतात जे, रजपुतांनीं मराठे बहुत मारिलें आणि पलविलें. असा प्रसंग आहे. श्रीकाशीहून पत्रें आजीं आलीं जे, शहरावर पठाण जातात; पुढें ईश्वर काय करील पाहावें. राजे माधोसिंग जाले. हे बहुतच दुर्बुद्धि निघाले, विश्वासघातकी निघाले. पुढें तेहि जमाव करीत आहेत. पैसा सुरक्षित द्यावा. राजीं बसविलें. सर्वस्वीं अंगिकार केला. हें तिलमात्र चित्तांत न आलें. बेइमानीवरच नजर दिली. बंगालियाकडील वर्तमान तर राजश्री रघोजी भोंसले यांजकडील फौज त्या प्रांतीं होती. कांहीं नवीहि फौज ईकडून गेली व पठाणहि तेथें सामील होते. ते हे सर्व मिलोन मकसुदाबादप्रांतीं येऊन कजिया केला आहे. आलावर्दीखान आजारी आहे. वर्षभर आजारी आहे. बहुतच क्षीण आहे. वरकड वर्तमान लिहावेसें नाहीं. रजवाडे भूमिया आपले आपले जागा हरामजादगिरी करीत आहेत. मनसुबे नाना प्रकारें करितात. त्यास स्वामीचे पुण्यप्रताप समर्थ आहे. वर्तमान सेवेसी लिहिलें आहे. वरचेवर होत जाईल तें सेवेसी लिहित जाऊन. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.