Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.98: [7-11-1758] Letter from Dattaji Scindia’s agent to the Peshwa at Poona with reference to the punishment to be inflicted on Antaji Mankeshwar and the Scindia's desire to meet the wishes of the Peshwa.

Selections from the Peshwa Daftar 2.98

Language
Marathi

2.98

श्रीपांडुरंग.

पौ छ २० रविलोवल

कार्तिक तिसा.

श्रीमंत माहाराज राजश्री पंत प्रधान

साहेब स्वामीचे सेवेसी.

विनंती. सेवक रामराऊ निळकंठ कृतानेक सिर सां। नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ताा कार्तिक शु।। सप्तमीपर्यंत महाराजांच्या कृपा कटाक्षे करून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. माहाराजानी कृपावंत होऊन आज्ञापत्र पाठविलें तें सादर होऊन सिरसा वंदिलें. पत्री आज्ञापिले कीं अंताजी माणकेश्वर याजपांसी फौज किती रांगडी व देसची मिळोन गणती चौकशी बेमुलहिजा करून करणे. पूर्वी नवा हजाराची गणतीप्रमाणे न करावे. दुसरे अंतरवेदीचे महाल त्याजकडे कोणकोणते आहेत व हवाल्यापैकीं वसूल काय आला तो लिहिणे, व राजकी मनसुबे पटणे सोडवावे, पैका मेळवावा, नाही तर लाहोर प्रांते अमल बसलाच आहे पुढें अटक पावेतो जाऊन पैका मिळे ते करणे. कर्जाची चिंता सर्व राजश्री × × × सच आहे म्हणोन आज्ञा केली. त्यास अंताजी माणकेश्वर प्रस्तुत दिलीस आहेत. त्याच प्रांतास जात असो. आपण आज्ञा केली त्याचप्रमाणे बेमुलहिजा करूनच चौकशीनें गणती घेऊ. नवे माहाल व हावाल्या-पैकीं वसूल कोणते परगणे त्याजकडे आले, वसूल काय पावला, तो लेहून पाठऊं. माहाराजाच्या आज्ञेशिवाय त्याचा मुलाहिजा धरून प्रतरणापूर्वक सेवेसी विनंती लिहिणार नाहीं. पूर्वीचे नव हजाराचे गणतीचे लिहिले. ऐसियास येविसीच्या वर्तमानास सरकारचे फडणीस अंताजीपंताकडे रूपनगरच्या मुकामी आले होते त्यास हे वर्तमान दखल आहे. आणि राजश्री पाटीलबावानी सेवेसी विनंतीपत्र लिहिले होतें रूपनगरीहून तेहि हजूर असेल; आणि हली विनंतीपत्र राजश्री पाटीलबाबांनीं सेवेसी लिहिले आहे त्याजवरून विदित होईल. वरकड राजकी मनसबे पटणे लाहोर वगैरे प्रांतीं जाऊन पैका मेळऊन कर्ज वारे ते करावे म्हणोन आज्ञा. ते चिंता रात्रंदिवस निजध्यास राजश्री पाटीलबावास आहे कीं, दीर्घ प्रयत्न करून धण्याची कृपा संपादावी तेच करावे. क्लेश बहुळ केले आणि परिणाम द्रव्य प्राप्त नाहीं, तरी वृथा श्रमच मात्र होतो. त्यास सर्व प्रताप तेज माहाराजाचे करणार आहे. सेवक लोकाची एकनिष्ठता आणि मेहनत यांत अंतर नाहीं. त्या प्रांतीं गेलिया नंतर घडोन येईल तें खरें. सांप्रत्य विनंती विशेष काय ल्याहावी ? राजश्री पाटील बावाचे चित्त सर्व आपले चरणी एकनिष्ठ आणि धण्याची कर्जाची चिंता सदैव मानसीं वागविता (त.) ईश्वर घडवील तो सुदीन की आपले आज्ञेप्रमाणें घडोन येईल हेच इच्छितात. सेवेसी श्रुत होय हे विज्ञाप्ति.