Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.6: [27-6-1761] Balaji Govind and Gangadhar Govind are attempting to restore order in the Doab after the disaster of Panipat.

Selections from the Peshwa Daftar 29.6

Language
Marathi

29.6

श्री

श्रीमंत राजश्री त्रिंबकराव नाना

स्वामीचे सेवेसी

पोष्यू बाळाजी गोविंद व गंगाधर गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. येथील कुशल तागाईत ज्येष्ठ वद्य १० पर्यंत आपले कृपेकरून यथास्थित असें विशेष. प्रस्तुत आपणांकड़ून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं, तर निरंतर पत्रीं परामृष करीत जावा. इकडील वर्तमान तर सर्व आपण पाहून गेलेच आहेत. अलीकडे आम्ही अंतरवेदींत उतरल्यानंतर मंगलपूर फफुंद दोन जागा पठाण व रोहिल्यांसीं जुंज जालें, परंतु श्रीमंत स्वामीचे प्रतापेकरून नक्षच जाहाला. वरकड ठाणीं रोहिले पठाणानीं सलोखेंच खाली करून दिलीं. कुरा व कडा येथें नवाब सुज्यातदौले याणीं ठाणीं बसविलीं होतीं तींहि सलोखेंच खाली जाहालीं. येक गाजीपूर मात्र वेणीबाहादर याणी कांहीं लोभावर नजर देऊन खिचराच्या हवाला किल्ला केला. तेथें रूपराव खिचर मातबर सरंजामानिशीं राहिला आहे. या प्रांतीं राजा कुशलसिंग व पंचमंसिंग वगैरे तमाम जमीदार गढ्या बांधोन फिरोन राहिले आहेत. रयेतेचें घरीं दाणा अगर पैसा राहूं दिला नाहीं; सर्व मुलुख लुटून जालोन खराब केला. कसब्यांतून मात्र सरकारी ठाणीं बसलीं आहेत. येखादे जागां गढ्यास लागोन जमीदारांचे पारपत्य करावें तर रोहिले फिरोन दंगा करावयाचे विचारावर आले. गंगातीरानें जागांजागां फौजा येऊन राहिल्या आहेत. कांहीं फौज सोरेमचे घाटीं उतरून सकुराबादेस आली. त्यास तिकडील सर्व जमीदार सामील होऊन सरकारी ठाणें ऊठविलें. येथूनहि फौज सकुराबादेकडे रवाना केली आहे. सकुराबादेस रोहिले आले. येणेंकरून तमाम माहालांत जमीदारांनीं दंगा करावयाचा विचार केला आहे. आम्हास कोणाचा उपराळा नाहीं. श्रीमंत स्वामीच्या प्रतापें जेथवर बंदोबस्त होईल तो करीतच आहों. मागाहून होईल वर्तमान तें लेहून पाठऊं. वरकड तीर्थस्वरूप राजश्री बाबूराव काका यासीं लिहिले आहे तें आपणांस विदित करतील. वरकड सर्व प्रकारें भरवसा आपला आहे. सदैव पत्रीं सांभाळ करीत असिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दीजे हें विनंती.