Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 3.9: [24-6-1733] Letter of Krishnaji Pawar to Bajirao giving details about the fighting at Gowalkot. Krishnaji is the adopted son of Tukoji Pawar of Dewas.

Selections from the Peshwa Daftar 3.9

Language
Marathi

3.9

राजश्री बाजीराऊ गोसावी यांसी.

@ अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहो कृष्णाजी पवार विस्वासराऊ दंडवत विनंती उपर. येथील कुशल जाणऊन स्वकीय कुशल लिहिले पाहिजे विशेष. गो॥ पत्र पाठविले ते पावले. लिहिला अर्थ कळून समाधान जाले. गोवळकोटीचे वर्तमान काय व अंजनवेलीस मोर्चियांची तरतूद कोणे रीतीची जाली आहे ते लिहिली पाहिजे म्हणऊन लिहिले. यैसियासी गोवळकोटास मोर्चे चार नजीक गेले आहेत. रविवारी नवमीस लोक खाडीपलीकडे रात्रीभागी घातले ते जाऊन मेढियासी ठेपले. मागाहून पाठी पुरोन आली नाहीं. याजकरितां मागें फिरोन आले. पुढेंहि जे तरतूद होणे ते होत आहे. राजश्री स्वामीनी किले वासोटा येथील येक भांडे पाठविले ते येऊन पावले. साताऱ्याहून सामान सुद्धा पांच पाठविले आहेत. तीं घाटाखाले आलीं. आजि दाखल होतील. वरकड दर किलीयासी एकेक भांडें आणून द्यावे यैसी आज्ञा राजश्री पंतप्रतिनिधी व राजश्री पंतप्रधान व राजश्री पंतसचिव यासी जाली आहे. वं तुम्हासहि बाणकोटीहून पाच भांडी आणून द्यावी यैसी आज्ञा जाली म्हणऊन लिहिला आहे. भांडी आली म्हणजे लागू करून मारगीर होईल. स्थळ रा॥ स्वामीचे प्रतापे फते होईल. अजनवेलीस राजश्री जीऊबा व आंगऱ्याकडील दीड हजार माणूस पांच सा तोफा येऊन सोमवारी दशमीस भांडी सुरु जाली तेथेहि मोर्चे कायम जाले. मागाहून राजश्री सेनापती याचीहि फौज रा॥ केली आहे म्हणऊन राजश्री स्वामीची आज्ञा जाली. आपणांस कळावे म्हणऊन लिहिले असे. आपण सविस्तर लेहून परामृश करीत जाणे. लोभ असो दीजे हे विनंती.

[seal: मोर्तब सुद.]