Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.22.8

Selections from the Peshwa Daftar 29.22.8

Language
Marathi

29.22.8

दुसरें पाणिपताहून आल्यानंतर राजश्री सुभेदारांनीं व राजश्री त्रिंबकराव सदाशिव नाना यांणीं किल्ले भिड प्रांत भदावर येथें जगन्नाथ धोंडाजी म्हणोन ग्रहस्थ ठेविला होता; त्यास अश्विन शुद्धांत भदावरचे राजानें मोर्चे लाविले; पंधरा दिवस जुंजला. गणेश संभाजीस कुमकेविशीं बहुत पत्रें पाठविलीं परंतु कुमक न केली. शेवटीं तग धरवेना तेव्हां ठाणें सोडून जगंनाथ धोंडाजी झांशीस आला. त्यावर लटकें निमित्य ठेऊन लुटून घेऊन झांशी किल्ल्यांत कैद केलें आहे. त्यापाशीं प्रतापशा निसर कारभारी तो सांगतो तैसें करितो. आज दोन वर्षे कालपी वगैरे तालुका दुसालां चोवीस लाख व बुंदेलखंडची जफ्ती मिळोन कमकसर पंनास लाख व झांशीचे संस्थानांत दांड वगैरे मिलोन दाहा बारा पावेतों इतका पैसा घेऊन लटका खर्च वाढऊन नास केला व आपलें घर केलें. सरकारांत सितैनमध्यें पुण्यांत लोकांपासून रसदा घेऊन च्यार लाख सरकारांत दिल्हे, त्यांपैकी ज्यास मामलती सांगोन पैसा घेऊन आपण खादला, त्याचा तसाच दोन लाख ऐवज राहिला तेव्हां सरकारांत दोन लाखच पावलेसे जाले, व इहिदेत दिल्लीत वराता वगैरे मिलोन पावती साडेतीन पावेतों वरकड वरातास ऐवज पावला नाहीं. शेठ्याची वरात व किल्ले ग्वालेरचे बेगमीची वरात यांस पैसा पावला नाहीं याप्रमाणें सितैन व इहिदेची गत. या सालची रसद सरकारांत दिल्ही नाहीं. यैवज वसूल घेऊन उडव * * * * बुंदेलखंडची जप्ती तशीच आहे. विना गणेश संभाजीचे पारपत्य केल्याखेरीज रजवड्याशीं सलूख होऊन पूर्ववतप्रमाणें अमल चालोन सरकारांत ऐवज येणार नाहीं. याकरितां राजश्री सुभेदारांनीं सेवकास समागमें ठेऊन घेतलेच. त्रिंबकराव शिवदेव यांचें नांवें कालपी वगैरे माहालची कमाविशीची सनद पाठऊन द्यावी म्हणोन स्वामीस विनंतीपत्र लिहून सेवकांजवळ दिल्हें तें सेवेसी पाठविलें आहे;