Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.22.9

Selections from the Peshwa Daftar 29.22.9

Language
Marathi

29.22.9

पावून सर्व अर्थ ध्यानांत येईल. विना सुभेदार ते प्रांतीं गेल्यावांचून बंदोबस्त होत नाहीं. झांशी चाळीस लाखाचें संस्थान व बुंदेलखंड राजश्री बाळाजी गोविंद यांकडे आहे. त्यासुद्धां तीस लाख व ग्वालेर वगैरे पांच सात लाख रुपयाची जागा राहात नाहीं. सुभेदार गेल्यानें इतकी जागा राहोन अंतरवेदी गेली आहे तेथीलहि बंदोबस्त होईल. परंतु राजे माधोसिंग याचा शह वारून ते प्रांतीं जाऊं याची सुभेदारास आज्ञा जालियास जातील. सेवेसी सविस्तर विदित व्हावें म्हणोन लिहिलें असे. आज दोन वर्षे गणेश संभाजीपाशीं कर्ज खाऊन राहिलों व हल्लींहि येथें कर्ज खात आहे. सेवकास आज्ञा येईल तदनुसार वर्तणूक करीन. राजश्री बाबूराव कान्हेरे याची सरकारांतून तहेंगीरी होऊन आठ नव महिने जाहाले. लोक सर्व उठोन गेले. संस्थान राहाणें कठीण जाणून सरकारचें आज्ञापत्र गणेश संभाजी पाठऊन आपण जाऊन झांशीस आणिलें. कुमकी पथकाप्रमाणें रहेना, उठोन जाऊं लागला, किल्ला हवाला करणें तरी राहेन म्हणोन गणेश संभाजीनें आड घातला; याकरितां झांशी किल्ला हवाला केला. त्याजवर बाबूराव यासी बदमामली करून कैद करावेंसें केलें. येविषयीं मशारनिल्हेचें पत्र सेवकास व राजश्री कृष्णराव गोविंद यास पत्र आलें तेंच बजिनस पाठविलें आहे त्यावरून विदित होईल. बाबूराव कान्हेरे यांचा शोध बहुत केला परंतु दुसरा विचार नाहीं. सरकार चाकरींत येकनिष्ठ आहेत; परंतु गणेशपंताचे पेचांत आहेत. वरकड वर्तमान राजश्री कृष्णराव गोविंद वकील यांणी विनंतीपत्र लिहिलें आहे त्या वरून विदित होईल. सेवेसी श्रुत होय हें विज्ञापना.